358) चिंतन : आंतरीक काव्यात्मक आत्मचिंतन Antarik kavyatmak Atmachintan

 चिंतन 358 : आंतरीक काव्यात्मक आत्मचिंतन Antarik kavyatmak Atmachintan

 
आंतरिक काव्यात्मक चिंतन

 

.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 358 :आंतरीक काव्यात्मक आत्मचिंतन🌹

...........................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..........................

चिंतन : काव्यात्मक आंतरिक आत्मचिंतन Antarik kavyatmak Atmachintan


🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


खुप शोधले त्या "मी " ने  "मी " ला ।

कुठेच न आढळला तो ॥

कुणी घडवला, कसा घडवला ।

खुप अचंबा पडतो ॥


इथे शोधला ।

तिथे शोधला ॥

शोधुन पहाता ।

विरघळुन गेला ॥


नच शोधीता गुणीत होतो ।

 शोधून पहाता विलिन होतो ॥

स्वसूत्राचा शोध लागतो ।

 मी पणाचा अर्थ उमजतो ॥


एकच सांगतो अरे मित्रांनो ।

 शोधुनी पहा रे शोधुनी पहा ॥

शोध घेता , शोध लागतो । 

बघता बघता बोध उगवतो ॥


बोधाचे ते सूत्र सुबोध ।

 शोधण्यातच  होतो बोध ॥

ना पद्धती असेना ना मार्ग असे ।

 स्वनिरीक्षणातच अर्थ असे ॥


स्वनिरीक्षणाचा ।

अर्थ कळो ॥

घटी घटी तो ।

दिप उजळो ॥



मन मायेचे प्रतिक ।

मन संस्कारांचे रुप ॥

 मन अविद्येचे प्रतिरुप ।

मन सर्वस्वी स्व-स्वरूप ॥


मन अज्ञानाची खाण ।

 मन अहम रूपी घाण ॥

 मन अवघे संमोहन ।

 मन अविद्या अधीष्ठान ॥

 


मन सर्व दुःखाचे माध्यम ।

 मन मोहमायेचे गोदाम ॥

 मन संमोहनाचा सापळा ।

मन भासाचा भोपळा ॥


मन काळाचा बाप ।

 मन मापाचेही माप ॥

 मन दोरीवरचा सर्प ।

मन शुक्ती- रजत स्वरुप ॥


मन चितशक्तीचा खेळ ।

 मन भवभ्रमाचा कल्लोळ ॥

 मन नामरुपाचे कारण ।

मन भोगाचे आमंत्रण ॥


मन अहम अधीष्ठान ।

 मन पिंडाचे आवरण ॥

 विश्वाचे स्वरूप ।

 मन ब्रह्मांडाचे रूप ॥


मन सदैव नित्यनुतन ।

 मन स्वयंभु स्वकारण ॥

मन फसवी मनाला ।

मन भुलवी विश्वाला ॥


मन संज्ञेचे ते बाळ ।

 मन संज्ञेचेही आजोळ ॥

मन व्यक्त - अव्यक्ताचा मेळ ।

मन भवचक्राचे मुळ ॥


मन संपुर्ण आभास स्वरुप ।

 मन ब्रह्मांडाचे खरे रुप ॥

 मना पटो मनाची ओळख ।

 मना हरो मनाचा काळोख ॥


मनाचे उगमस्थान परमात्मा ।

 मनाचे ते अधीष्ठान परब्रह्मा ॥

मनाचे मुळ ते परमात्मा ।

 आहे मनाच्या पार परमेश्वर ॥


मन बंधमुक्तीचे कारण ।

 मन जन्म - मृत्युचे संचालन ॥

 मन सृष्टी रुपी आकार ।

 मन मृगजळाचा प्रकार ।।


मनाचे स्वरुप ओळखा ।

मनाचा  चक्रव्युह जोखा ॥

 मनाच्या ओळखावे डावा ।

मनाचा जाणावा तो कावा ॥


मन साधनेचे साधन ।

 मन तपश्चर्येचे तपोवन ॥

मन मुक्तीचा महामंत्र । 

मन निर्वाणाचे तंत्र ॥


धुंडाळण्या देव ।

बहिर्मुख उठाठेव ॥

 सर्वांनाच चेव ।

भरला जसा ॥


हठयोग करती ।

ब्रह्मचर्य पाळती ॥

पण कामनांची गती ।

 शमली नसे ॥


कपड़े बदलती ।

भगवे घालती ॥

पण मनाची गती ।

जैशीच्या तैशी ॥


मांडी ते घालती ।

ध्यान ते करती ॥

 पण निष्काम मती ।

 प्रकटेच ना ॥


मंदिरी ते जाती ।

 गुरुसी भजती ॥

 मनाची आसक्ती ।

संपेच ना ॥


देह ती माती ।

 दुःखाची वस्ती ॥

 मातीची आसक्ती ।

 दुःख असे ॥


मनाच्या पोटी ।

 जगाची उत्पती ॥

 जगाची प्रचिती ।

 मन आहे ॥


संतांचे संगती ।

तुटे भ्रमाची भ्रमंती ॥

मी पणाची समाप्ती ।

 आत्मज्ञान ॥


संताची ती भेट ।

 भ्रमाची सांगता ॥

 संताची ती भेट ।

 पुण्यवंता ॥


पोथी ते वाचती ।

पारायणे करती ॥

परी मनाची भ्रमंती ।

 जशीच्या तशी ॥


अन्नछत्र चालविती ।

दानधर्म करती ॥

 परी पुण्याची आसक्ती ।

 गेली नसे ॥


मनासी जाणण ।

मनाची बोळवण ॥

मनासी जाणण ।

मनाची दाणादाण ॥


मनासी जाणणं ।

निजबोधाचे वळण ॥

 मनासी जाणण ।

 अध्यात्माचा प्राण ॥


मनाचा तो अंत ।

 मायेचे निर्गमन ॥

 संस्कारांच संपण ।

निजबोध आहे ॥


मनाचा अंत ।

प्रतिमा निराकरण ॥

 प्रज्ञेचे प्रकटन ।

मनाच्या अंती ॥


मनाचा लय ।

 प्रश्रब्धीचा समय ॥

मनाचा लय ।

करुणेचा उदय ॥


मनाचा लय ।

 मैत्रीचे आलय ॥

 मनाचा लय ।

 मुदिता वलय ॥


मन जेथे संपतं ।

 तेथे बा वेदांत ॥

 मन ते विरता ।

 प्रकटते गीता ॥


मन न उरण । 

तेथे बा कुराण ॥

मनाची ती उकल ।

तेचि बायबल ॥


मन बुद्धाचा धम्म ।

 मन शंकराचार्याची माया ॥

 मन महावीराचा प्रमाद ।

मन कबीराचा घुंघट ॥


मन जाणो मना ।

हरएक प्रतिक्षणा ॥

बुद्धी बुद्धीस क्षणोक्षणा ।

मना चरणी हीच प्रार्थना ॥


मनी ते घडो । 

मनाप्रती जागणे ॥

 मनाचे जागणे ।

 तेचि ब्रह्म होणे ॥


सर्व वासनांची समाप्ती ।

 मनाची समूळ गच्छंती ॥ 

मग ब्रम्हाची समज ती ।

प्रकटे तेथे ॥ 


ज्ञाना आणी तुका ।

येथेच भेटती ॥

 हरीशी ही भेट ।

 याच चित्ती ॥


जग - देह - मन ।

 तुटता तीन भ्रम ॥

 आपुलीच गाठ ।

 आपल्याशी ॥


🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿

🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


विसरोनी स्वस्वरूपला ।

 विश्व होवुन प्रकटतो ॥

 त्या माझ्या मी ला ।

मी नमस्कार करतो ॥


माझ्याच लिला ।

 मी स्वयेची पाहतो ॥

 अद्वैत अनुभवून ।

द्वैत ही भोगतो॥


मुळी मी एकत्व ।

 अनेकत्वात प्रकटतो ॥

माझ्याच कल्पनांनी ।

मी मला विसरतो ॥


माझे मला विस्मरण ।

मुळ जे आकांत कारण ॥

मी मांडला आकांत ।

 आणी मीच तो पाहतो॥


माझी कीव जेव्हा ।

 माझीच मला येते ॥

गळता मन पिसारा ।

 जाग मला येते ॥


गळणे मन पिसाऱ्याचे ।

 तेच बा सुत्र जागृतीचे ॥

 अन्यथा हे विश्व ।

फळ जे विस्मृतीचे ॥


जगी खुप फैलो ।

 सुत्र जागृतीचे ॥

 अनुभवो विश्वमात्र ।

राज्य समाधीचे ॥


🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿




🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿



अमृत तत्व प्रकटले ।

 माझ्या अंतरात ॥

न्हावु कशाला सांगा ।

मी तीर्थ - संगमात ॥


मी आणी परमात्मा ।

अभिन्नता वसली जेथे ॥

 करावया बा वंदन ते । 

भक्त उरला तो कोठे ॥


आता न उरली पुजा ।

न उरले ते पारायण ॥

 अंतरी बा उमजला ।

 मी च तो नारायण ॥


आता सकल विश्व ।

स्वयेचि जो जाहला ॥

 सर्वत्र मीच असता ।

 हिणवु कसा कुणाला ॥


आता संपली उपासना ।

नि संपले ते ध्यान ॥

 अवघे विश्व विरुनि उरले । 

 अनंत अवधान ॥


आता संपले भटकणे ।

जीव बनुन प्रकटणे ॥

 आता जन्म मृत्युचे ते भासणे ।

 अंतरी नाही ॥


सत्संग जिवनी आला ।

 परीस स्पर्श जाहला ॥

 अंतरी ध्यान फलीत होता ।

 अमृताचा बोध ,अमृतास झाला ॥


🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿

🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


अस्तित्व अवघे ।

 कल्पनाची असे रे ॥

दिसते भासते ।

परी ते नसे रे ॥


कल्पनेचा अदभुत ।

डाव हा पसारा ॥

कसा काय तो ।

अंतरासी विचारा ॥


आपसूक चाले ।

 हा अस्तित्व डोलारा ॥

भरीव भासतो ।

जो पोकळीचा नगारा ॥


अस्तित्व नि अहंता ।

भिन्नता नसे रे ॥

विरता अहंता । 

अभिन्नता वसे रे ॥


अहंता अवघीच ।

 मनाची कल्पना ॥

मनाचे मनाशीच ।

गुढ द्वंद्व नाना ॥


विरता द्वंद्वता ।

अनंतता उरे रे ॥

मिटता अहंता ।

 प्रश्न तो सुटे रे ॥


कल्पनेचा अदभुत ।

 डाव हा पसारा ॥

कसा काय तो ।

अंतरासी विचारा ॥


देह अभिमान ।

 जळो ते रे मन ॥

घडो ते दर्शन ।

दर्शनासी ॥


स्वरूप अज्ञान । 

 तेचि असे मन ॥

अहमच भासण ।

पडदा आहे ॥


विरता ते मन ।

मग प्रकटते ज्ञान ॥

विरता ज्ञान - अज्ञान ।

 तत्व आहे ॥


ज्ञानाला होता ज्ञान ।

तुटते ते बंधन ॥

 मग ज्ञान - अज्ञान ।

 दोन्ही नाही ॥

🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿

🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


जगाचे प्रकटन ।

अहमचे उपादान ॥

ज्ञान आणि अज्ञान ।

भ्रम दोन्ही ॥


कसे ते सांगावे ।

शब्दी ते न यावे ॥

उच्चारता व्हावे ।

 असत्य की ॥


अविद्या आणि मन ।

दुःखाची ती खाण ॥

विरता ते अहमपण ।

आत्मबोध ॥


प्रज्ञा तेचि ज्ञान ।

 आत्मा तेची विज्ञान ॥

 ब्रह्म -जाणीव - चेतन ।

भिन्न नाही ॥


उपनिषदांचे सार ।

वेदांच्याही पार ॥

मनाच्या पार ।

तत्व आहे ॥


प्रकृतीच्या बळे ।

मनाचेच पाळे ॥

मी पणामुळे ।

अस्तित्व भास ॥


मी पणाची आसक्ती ।

तीच विश्वाची प्रचिती ॥

 अस्तित्व अनुभुती ।

अहम ठायी ॥


भवचक्राचे कारण ।

अहंकार जो धारण ॥

अहंकार निराकरण ।

तत्व आहे ॥


जीवाचे जीवपण ।

सर्व दुःखाचे कारण ॥

त्याचे होय आकलन ।

निजबोध प्रकटता ॥


सत्संगा कारण ।

निजबोध प्रकटन ॥

 अस्तित्व आकलन ।

निजकृपा ॥


🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿

🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


जेव्हा अयाचित ।

 डोळे उघडले ॥

मग शब्दांचे ते ।

 अर्थ बदलले ॥


त्या शब्दांच्या । 

अर्थ बदलण्यात ॥

मग जगण्याचेही ।

संदर्भ बदलले ।


आता जगण्याचा ।

अर्थ समजला ॥

 मृत्युचाही ।

 मृत्यु पाहीला ॥


आता दृष्टी ।

स्पष्ट जाहली ॥

धम्माची ती ।

 खेळी उमजली ॥


दृष्टी बंधने ।

गळुन पडली ॥

यथाभूत ती ।

पाहु लागली ॥


पहाण्या पहाण्यात ।

 रंग वितळले ॥

पंचस्कंधाचे ।

विघटन घडले ॥


त्या विघटनात ।

बोध उगवला ॥

 चित्तधारेचा ।

खेळ उमजला ॥


अस्तित्वाचा ।

अर्थ समजला ॥

अनंत काळाचा ।

संघर्ष संपला ॥


जसे उघडले कान ।

 कानी पडला गोंगाट ।

 जो तो म्हणे हेचि सत्य ॥

 अवघा की गोंधळाचा थाट ॥


घेतला शोध संप्रदायांचा ।

 अवघ्या गोल गोल वाटा ॥

 भेटला सदगुरु त्याने ।

हाणला मी पणावर सोटा ॥


बरं झाल बघा ।

उघडल डोळं ॥

भेटला सदगुरु ।

संपला शोधाचा तो खेळ ॥


अवघा मनाचा हा खेळ ।

जस माकोडीचं जाळ ॥

माकोडीच विणी त्याला ।

 आणि माकोडीच काळ ॥


मन माकोडीच्या खेळात ।

बंधुंनो जागा रे सकळ ॥

 येई जाग तुटे जाळ ।

संपे धम्माचा तो खेळ ॥


बरं झाल बघा ।

उघडल डोळ ॥

 भेटला सदगुरु ।

संपला शोधाचा तो खेळ ॥


सदगुरु म्हणे घे रे शोध ।

कैसे उगवे मी पणाचा तो खेळ ॥

 शोधताना मी पण ।

संपला मी पणाचा तळ ॥


आढळलं मी पण ।

 जसं स्वप्नातलं मृगजळ ॥

 मी पणाची जाणीव ।

त्रिपुटीचे ते बाळ ॥


बरं झाल बघा ।

उघडल डोळं ॥

भेटला सदगुरु ।

 संपला शोधाचा तो खेळ ॥


मी पणाचा भ्रम ।

अवघ्या दुःखाचे ते मुळ ॥

 मी पणात बळकटे ।

द्रष्टा - दृश्याचा तो खेळ ॥


पंचकोषाचा तो खेळ ।

 अवघ्या भुल भुलैय्याचे मुळ ॥

घे रे उमजुन मना ।

चित्तधारेचा तो खेळ ॥


बरं झाल बघा ।

 उघडल डोळं ॥

भेटला सदगुरु ।

संपला शोधाचा तो खेळ ॥


तयासी अनुभवण्या ।

मन निरुपयोगी ॥

 बुद्धीचा भोगी ।

भ्रमिष्ठ तो जोगी ॥


तयासी जाणण्या ।

चित्त असमर्थ ॥

मी पणाच्या परे ।

 असणे की त्याचे ॥


स्मृती आणी कल्पना ।

 भ्रमविती जना ॥

 तेथे ते रमणे ।

 नरक यातना ॥


तयाचे अस्तित्व ।

 शब्दांच्या पलिकडे ॥

 पश्यंती मध्यमा ।

 वैखरी तोकडे ॥


अज्ञानाची संगत ।

अहंकाराचे साकडे ॥

ग्रंथ परंपरा पद्धती ।

 यासी त्याचे वाकडे ॥


जयासी लागला ।

 आत्यंतिक वेध ॥

तोचि जाण योग्य । 

त्याच्या भेटी ॥


हृदयात ऐसी ।

 लागत असे आग ॥

बेहोषी जावुन ।

मग येतसे जाग ॥


बेहोषीचे जाणे ।

 नसे योगायोग ॥

जन्मो - जन्मींची आस ।

तेव्हा घडे योग ॥


जन्म - जन्मांतरीची तपस्या ।

येत असे बा फळा ॥

 मुक्तांची ती संगत । 

मरण सोहळा काळाचा ॥


मुक्तांची ती संगत ।

मुक्तीची ती रीती ॥

मी पणाचे मरण ।

मुक्तच शिकविती ॥


🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿



🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


कसे वर्णू या ,

अस्तित्वाला ।

 कसे वर्णू या ,

माझ्या मी ला ॥


वर्णन अवघे ,

 असत्य ठरते ।

शब्दी कधी का ,

 सत्य उतरते ॥


शब्दा पलिकडील ,

 विश्व मनोरम ।

 महदाकाशी ,

 प्रकटे चमचम ॥


त्या चमचमण्या ,

असंख्य नावे ।

 जसे भावले ,

 तसेच गावे ॥


कुणी संबोधले ,

ईश्वर त्यासी ।

कुणासाठी ते ,

ब्रम्ह असे ॥


कुणी वर्णीले ,

बिंदु स्वरुप ते ।

 कुणी अष्टकलाप ,

पुरते ॥


कुणी संबोधले ,

 समष्टी त्यासी ।

 कुणासाठी ते ,

अंग अष्ट प्रमाण ॥


कुणी वर्णीले ,

दर्शन स्वरूप ते ।

 कुणासाठी ते ,

 ज्ञान असे ॥


कुणी वर्णीले ,

 आकाश स्वरूप ते ।

 कुणासाठी ते ,

चैतन्य असे ॥ 


कुणा ठायी ते ,

तारे लक्ष लक्ष ।

कुणासाठी ,

अनंत आकाश ॥


आता मजला ,

 सांगा तुम्ही हो ।

 आढळे का कोठे ,

सुक्ष्म विरोधाभास ॥


एक अनुभुती ,

 नि एकच वस्तु ती ।

अनेक व्याख्या ,

जगी पसरती ॥


अहम ब्रह्मास्मी ,

भावित होत असे ।

"तत त्वम असी " चा ,

 अर्थ प्रकटत असे ॥


आता न कुणी तो ,

 परका उरला ।

 मी तू पणाचा ,

भाव तो विरला ॥


आता अवघा ,

 संशय फिटला । 

चित्त धारेचा,

 खेळ उमजला ॥


आता उरले ,

 फक्त बघणे ।

अस्तित्व शृंखलेत, 

जाणीव बनणे ॥


🌿🌿🌿  🌹🌹  🌿🌿🌿




🌿🌿🌿 🌹🌹 🌿🌿🌿


निर्विकल्पपणे ।

 जे जे देखीले ॥

 ते आपणहून ।

नाहीसे झाले ॥


पहा कैसा ।

 चमत्कार झाला ॥

आपणच पाहता ।

 आपल्याला ॥


प्रथम पाहीले ।

त्या श्वासाला 

छोटा मोठा ।

 आला गेला ॥


पहाता पहाता ।

 मंद झाला ॥

 शेवटी न सापडला ।

पाहु जाता ॥


मग बारी ।

वेदनेची आली ॥

 सुखद - दुःखद ।

संवेदना प्रकटली ॥


पहाता तिजला ।

निर्विकल्प पणे ॥

कोठे गेली ।

कोण जाणे ॥


अचानक मग ।

 प्रकटले मनो संस्कार ॥

 भयाची ती वखार ।

अंतरी होती ॥


निर्विकल्प पणे । 

तिला पाहता ॥

तिचीही मग ।

झाली सांगता ॥ 


मग उभारली ।

सुंदर दृश्ये ॥ 

विविध रंग नि ।

विविध छटा त्या ॥


कधी न देखील्या ।

या जन्मी त्या ॥

 निर्विकल्प निरीक्षणात ।

त्या ही गेल्या ॥


मग अचानक ।

फुगाच फुटला ॥

पाया खालचा ।

आधारच गेला ॥ .. ( सुषुप्ती निरास)


शरीर मनाचा । 

संबंध तुटला ॥

 नि झालो मी ।

 चिदाकाश ॥ .. ( ब्रम्हमयता )


चिदाकाशी मग ।

 निर्विकल्प रहाता ॥

 अनंत तत्व ते ।

मग अवतरले ॥ .. ( ब्रम्हमयता निरास )


महदाकाशाचे ।

 आगमन झाले ॥

आता मीच होतो ।

महदाकाश ॥ .. ( परब्रम्हबोध )


अगदीच अनोखा ।

अनुभव होता ॥ 

धम्माची ती ।

अंतीम सत्ता ॥ .. ( धम्म = जाणीव )


अष्टकलापाचा ।

 समुदय होता ॥

आणि स्वस्वरुपाचा ।

अंतीम पत्ता ॥


स्व स्वरुप अनुभवत ।

 मन विरते झाले ॥

 दिर्घ श्वास घेत ।

 मग पुन्हा जागले ॥


डोळे उघडता ।

 पुन्हा आढळले ॥

पंचेंद्रियांच्या ।

विळख्यात ॥


अशी विपश्यना ।

भावीत झाली ॥

 धम्मगीरीवर ।

करुणा बरसली ॥


धम्माची ती ।

खेळी उमजली ॥

बुद्धाची ती ।

करुणा पावली ॥

🌿🌿🌿 🌹🌹🌿🌿🌿


-विजय पांढरे

9722992578

02-03-2022

vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या